– सुनील नवले, लोकसत्ता
संगमनेर : चीनमध्ये योगाचे धडे देण्यासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातल्या युवकाचे एका चिनी तरुणीशी प्रेम जुळले. या प्रेमसंबंधाला लग्नाच्या नात्यात गुंफण्याचा निर्णय या जोडीने घेतला. आई-वडिलांना एकुलती एक मुलगी असलेल्या त्या मुलीच्या लग्नाला घरच्यांनी आनंदाने संमती दिली. मुलाच्या घरचेही तयार झाल्यानंतर मोठ्या थाटामाटात नुकताच तालुक्यातल्या घारगाव गावातील एका मंगल कार्यालयात या दाम्पत्याचा विवाह सोहळा थाटात पार पडला. राहुल हांडे असे योगशिक्षक असलेल्या तरुणाचे तर शान या हे त्याच्या चिनी पत्नीचे नाव आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयात योगाचे शिक्षण घेतले. उत्तम प्रशिक्षक झाल्यानंतर चीनमध्ये योगशिक्षक म्हणून तो गेला. तेथे योगा विषयी कमालीची आवड असणाऱ्या शान या तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघांचे स्वभाव आणि आवडीनिवडी जुळल्यानंतर त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुलने आपल्या आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली. त्यांनी आढेवेढे न घेता लग्नास मान्यता दिली.
हेही वाचा – शरद पवारांबाबत वसंतदादांची बदल्याची भावना नव्हती – विशाल पाटील
पठार भागातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या भोजदरी या छोट्याशा गावातील राहुल हांडे २९ वर्षांचा असून ३१ वर्षीय शान यान छांग या चीनी तरुणीशी चिनी पद्धतीने कोर्ट मॅरेज केले. भारतात आल्यानंतर पुन्हा खास महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा काल विवाह झाला. असल ग्रामीण भागाच्या रितीरिवाजानुसार गेली तीन-चार दिवस या विवाह सोहळ्याची लगबग चालू होती. वधू-वरांचे हात सुंदर मेहंदीने सजले होते. रीतसर हळदी समारंभही पार पडला. वराची धुमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली, भटजींनी मंगलाष्टके म्हटली आणि वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून हा बहुचर्चित विवाह सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्राची ही ग्रामीण संस्कृती बघून, अनुभवून शान भारावून गेली. त्यानंतर राहुल याने सर्व वऱ्हाडी मंडळींना आपली लव्ह स्टोरी सांगितली. चीनमध्ये नवखे असताना शानशी झालेली ओळख, जुळलेली रेशीमगाठ ते विवाह इथपर्यंतचा प्रवास त्याने कथन केला. त्यावेळी उपस्थितांनीही टाळ्यांच्या गजरात आनंद साजरा केला. भारावून गेलेल्या शानने “नमस्कार.. कसे आहात?” अशी चक्क मराठीतून भाषणाला सुरुवात करत नंतर इंग्रजीतून इथली संस्कृती, माणसे आपल्याला मनापासून आवडली असे सांगत उपस्थित वर्हाडी मंडळींचे आभार मानले.
हेही वाचा – अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत? छगन भुजबळ म्हणाले…
या आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, जालिंदर गागरे, संगमनेर महाविद्यालयाच्या योग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र वामन, अण्णासाहेब वाडेकर यांच्यासह राहुल हांडेचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.