देशातील कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजिलेल्या संघर्ष संदेश यात्रेचे १० मार्च रोजी नाशकात आगमन होत आहे. खा. सीताराम येचुरी, पॉलिट ब्युरोचे सदस्य निलोत्पल बसू व राज्य सरचिटणीस अशोक ढवळे हे यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने रविवारी कळवण व नाशिक येथे त्यांच्या जाहीर सभांचेही आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती माकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉ. डी. एल. कराड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. देशातील बहुचर्चित विकासाचा वाटा कष्टकऱ्यांच्या पदरात पडत नाही. श्रीमंत व गरीब यांच्यातील विषमता प्रचंड वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर, अन्न, वस्त्र व निवारा, पाणी, जमीन आणि रोजगाराबरोबर शिक्षण व औषधोपचार हे अधिकार जनतेला मिळवून देऊन महागाई, भ्रष्टाचार, धर्माधतामुक्त अशा नव्या भारताच्या निर्मितीचा पक्षाचा निर्धार असल्याचे माजी आमदार जे. पी. गावित व कराड यांनी सांगितले. मुंबईहून निघणारी ही संघर्ष संदेश यात्रा उंबरठाण मार्गे कळवणला पोहोचेल. रविवारी सकाळी दहा वाजता कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांची जाहीर सभा होईल. सायंकाळी सहा वाजता शहरातील राणेनगर येथील स्वामी विवेकानंद मैदानात दुसरी जाहीर सभा होईल. तत्पूर्वी, दुपारी चार वाजता विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. संघर्ष यात्रेचे शहरात मोटारसायकल फेरीद्वारे स्वागत केले जाणार असल्याचे कराड यांनी सांगितले.

Story img Loader