भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे यांची २८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान दोन टप्प्यांत होणारी सिंदखेड ते चौंडी संघर्षयात्रा गुरुवारी (दि. २८) सुरू होत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला उद्या (बुधवारी) श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबा समाधीचे दर्शन घेऊन पंकजा यात्रेवर रवाना होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सोळा ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वारस पंकजा मुंडे या २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, तसेच ११ ते १८ सप्टेंबर असे दोन टप्प्यात संघर्षयात्रा करणार आहेत. राज्यातील ७९ विधानसभा मतदारसंघांतून तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून यात्रेचा समारोप चौंडी (जिल्हा नगर) येथे होणार आहे.
यात्रेची सुरुवात करण्यापूर्वी उद्या (बुधवारी) श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सिंदखेडला जाणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदीया यांच्या उपस्थितीत गुरुवारी यात्रेला सुरुवात होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ५ दिवसांत सिंदखेड राजा येथून यात्रा मंठा, जिंतूर, परभणी, गंगाखेड, कंधार, नरसी नायगाव, नांदेड, कळमनुरी, िहगोली, मालेगाव, खामगाव, मलकापूर, बोधवड, जामनेर, सिल्लोड, फुलंब्री, मेहगाव, औरंगाबाद शहरात येणार आहे. प्रमुख १६ ठिकाणी जाहीर सभा, माध्यमांशी संवाद, कार्यकत्रे व नागरिकांशी भेटी घेत यात्रा २ सप्टेंबरला औरंगाबाद शहरात आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होईल.

Story img Loader