नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे समर्थक असलेल्या संगीता अरुण मंडलिक या मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सुशीला सुभाष त्रिभुवन यांचा पराभव केला.
काँग्रेसच्या नगरसेविका अनिता प्रकाश ढोकणे यांचा जातीचा दाखला खोटा निघाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. त्यामुळे एका जागेची पोटनिवडणूक घेण्यात आली. लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच सेना-भाजपने पक्ष चिन्हावर निवडणूक लढविली नाही. निवडणुकीत अपक्ष उमेदवार संगीता मंडलिक व सुशीला त्रिभुवन यांच्यात सरळ लढत झाली. काल ८ हजार ७४० मतदारांपैकी ४ हजार २१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निम्यापेक्षा कमी मतदारांनी मतदान केले. मंडलिक यांना १ हजार ७०० मते मिळाली. ११० मतदारांनी नाटोचे बटण दाबून नकारार्थी मतदान नोंदविले. मंडलिक यांचा विजय झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. ससाणे, कांबळे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण, आशिष धनवटे, विजय शेलार, दिलीप नागरे, भरत कुंकूलोळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
पोटनिवडणूक झालेल्या प्रभागात बौद्ध, ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विरोधात असूनही ससाणे समर्थक असलेल्या अपक्ष उमेदवार मंडलिक यांच्या विजयामुळे शहराच्या राजकारणावर ससाणे यांची पकड आजही भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader