सांगली : बेडग (ता. मिरज) येथील समर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काविळीची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले. १८ कावीळबाधित मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बेडग येथे समर्थ आश्रमशाळा असून, या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारे सुमारे ४८० विद्यार्थी आहेत. ही आश्रमशाळा निवासी असून, वास्तव्यास असलेल्या मुलांना थंडी, ताप, कणकण याबरोबर अपचन व उलटी याचा त्रास होत असल्याचे दि. १४ फेब्रुवारी रोजी निदर्शनास आले. प्रारंभी मोजक्या मुलांची तक्रार होती. आजारी मुलांना आरग येथील प्राथमिक उपचार केंद्रात तपासणीसाठी नेण्यात आले. रक्तचाचणीत कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आणखी काही मुलांना कावीळची लक्षणे दिसू लागल्याचे संस्थेचे संचालक अशोक ओमासे यांनी सांगितले.
गुरुवारी १८ विद्यार्थ्यांना अतित्रास होऊ लागताच त्यांना तत्काळ मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी १२ जणांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, तर उर्वरित मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी सहा जणांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कावीळबाधित मुलांची संख्या अधिक असून, मुलांना पिण्यासाठी इंधन विहिरीचे पाणी वापरले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने मुले इंधन विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. यातूनच काविळीची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.