सांंगली : आठ दिवसांपूर्वी पडलेल्या वळीव पावसाने वाहून गेलेल्या मिरजेतील रूईकर कॉलनीच्या पाणंद रस्त्यावरील पुलासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने २ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी रूईकर कॉलनीतील नागरिकांनी कदम व भाजपचे प्रा. मोहन वनखंडे यांचा सत्कार करून आभार मानले.
गेली सहा दशके या भागातील सुमारे ५०० कुटुंबे पावसाच्या हंगामात अडचणीतून प्रवास करत होते. शहरानजीक असलेल्या या कॉलनीसाठी पाणंद रस्त्याने जावे लागत होते. यंदाच्या पावसाने उभारण्यात आलेला हंगामी पूलही वाहून गेल्याने वृद्ध, महिला व शाळकरी मुले यांना या रस्त्यावरून जाता येत नव्हते. यामुळे या नागरिकांची गैरसोय दूर करण्याची विनंती कदम यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली. त्यांनी तातडीने नगरविकास खात्यातून नव्याने पूल उभारणीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला.
हेही वाचा – खंबाटकी घाटात माल ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी, पुण्याहून साताराकडे जाणारी वाहतूक ठप्प
कदम यांनी सांगितले याशिवाय महापालिका क्षेत्रामध्ये कुपवाडमधील प्रभाग आठमधील तुळजाई नगरमध्ये बसवेश्वर महाराज अनुभव मंडप उभारणीसाठी अडीच कोटी आणि मिरासाहेब दर्गा परिसर विकास कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जनसुराज्य शक्ती हा पक्ष महायुतीतील घटक पक्ष असून या सरकारने आमच्या पक्षाच्या मागणीवरून हा निधी मंजूर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.