सांगली : जलवाहिनी जोडकाम करत असताना झालेल्या धुरामुळे मधमाशांनी ५० हून अधिक नागरिकांवर हल्ला करण्याची घटना मांगले (ता. शिराळा) येथे सोमवारी रात्री घडली. नागरिकासह महिला व मुलांवरही या मधमाशांनी हल्ला करत दंश केला.
मांगले येथे गणेशनगर परिसरात जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू होते. यावेळी प्लास्टिक नलिका जोडण्यासाठी विद्युतयंत्राद्वारे गरम करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे करत असताना धूर झाल्याने एका घरावर बसलेल्या मधमाशा उठल्या. त्यांनी या परिससरात उपस्थित असलेल्यांवर दंश करण्याचा सपाटा लावला. रस्त्यावर काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या महिलांनाही मधमाशांनी दंश केला.