सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावच्या हद्दीमध्ये नदीकाठी १४ फुटी मगर मृतावस्थेत आढळून आली. मादी जातीची ही मगर असून दोन मगरींच्या भांडणात तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केला आहे.
ब्रम्हनाळ या गावी नदीकाठी असलेल्या मळी भागात एक मगर निपचित पडून असल्याचे शेतकर्यांना दिसून आले. उन्हासाठी ती नदीकाठच्या मळीत विसावली असल्याची समजूत प्रारंभी झाली. मात्र, या मगरीची काहीच हालचाल होत नसल्याचे दिसताच याची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली.
गावातील नागरिकांना १४ फुटी मगर दिसल्याने पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, मगरीची काहीच हालचाल होत नसल्याने कुतहूलही निर्माण झाले होते. वन कर्मचार्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मगर मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले. मगरीच्या जबड्यावर जखमाच्या खुणा आढळून आल्या असून, यामुळे हद्दीच्या वादातून दोन मगरीमध्ये कलह झाला असल्याची शक्यता वन विभागाच्या कर्मचार्यांनी व्यक्त केली. दोन मगरींच्या भांडणात या मगरीचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक अनुमान काढण्यात आले. मृत मगरीला कुपवाड येथील वन विभागाच्या मुख्यालयात आणून तिच्यावर अंत्यविधी करण्यात आला.