श्रींच्या स्वागत मिरवणुकीवेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल मिरजेत चार गणेशोत्सव मंडळ आणि ध्वनीवर्धक यंत्रणाचे मालक यांच्याविरुध्द शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक राजू सावंत्रे यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला काही मंडळाच्या स्वागत मिरवणुका जल्लोषात काढण्यात आल्या. न्यायालयाने निर्देशित केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी उप निरीक्षक श्री. सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलीसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
आवाज १०२ ते ११३ डेसिबल पर्यंत आढळून आला –
मिरवणुकीतील ध्वनीचे मोजमाप केले असता १०२ ते ११३ डेसिबल आढळून आल्याने चार मंडळाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यामध्ये मंगळवार पेठचा राजा, मिरजेचा सम्राट, श्रीराम मंडळ आणि शनिवार पेठचा राजा या मंडळाविरुध्द कारवाई करण्यात येत असल्याचे निरीक्षक सावंत्रे यांनी सांगितले. पूर्ण उत्सव काळात ध्वनी नियंत्रक पथक कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच ध्वनीयंत्रणा जप्तीची कारवाईसुध्दा केली जाणार आहे.
दरम्यान, मूर्तीच्या उंची बाबत शासनाने निर्बंध शिथिल केल्याने शहरात २२ फुटी गणेश मूर्तीचे आगमन काल रात्री उत्साहात करण्यात आले. मिरजेचा सम्राट दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ भारत नगर यांनी २२ फूट उंच अश्वारुढ गणेश मूर्ती स्थापना करण्यासाठी आणली आहे.