नुकताच एनसीईआरटीने दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीने ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे राज्यव्यापी प्रबोधन अभियान राबवले आहे. या अभियानांतर्गत सांगली अंनिस शाखेच्या वतीने आज एनसीईआरटी दिल्लीला पोष्टकार्ड पाठवून निषेध नोंदविला. तसेच एनसीईआरटीने पुन्हा डार्विनचा उत्क्रांती सिध्दांत अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे म्हणाले, “डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत भाग अभ्यासक्रमातून वगळून नागरिकांना शिक्षणातून मिळणारी विज्ञानवादी चिकित्सकवृत्ती नष्ट करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. डार्विनचा सिद्धांत जगाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य करतो.”
“उत्क्रांतीच्या शिकवणीमुळे भोंदूगिरी करणाऱ्यांची दुकानं बंद”
अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले, “ज्यांना भोंदूगिरीच्या व धर्माच्या साहाय्याने आपली राजकीय, सामाजिक सत्ता अबाधित ठेवायची आहे, त्यांची दुकाने उत्क्रांतीच्या शिकवणीमुळे बंद पडतील. या भीतीमुळेच डार्विन उत्क्रांतीच्या सिद्धांताला विरोध होत आहे.”
हेही वाचा : “गुणवत्ता ही दांभिक कल्पना”, अंनिसच्या विशेषांक प्रकाशनात डॉ. सुखदेव थोरात यांचं मोठं विधान
यावेळी सांगली शहर अध्यक्ष गीता ठाकर, कार्याध्यक्ष आशा धनाले, सचिव डॉ.सविता अक्कोळे, विज्ञान लेखक जगदीश काबरे, प्रा. अमित ठाकर, चंद्रकांत वंजाळे, त्रिशला शहा, सुहास यरोडकर, सुहास पवार उपस्थित होते.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
“माननीय संचालक, एनसीईआरटी, दिल्ली. दहावीच्या अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत, आवर्तसारणी, लोकशाही असे मूलभूत विषय वगळून मुलांच्या वैज्ञानिक विचारांचे खच्चीकरण केल्याबद्दल आम्ही सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपला निषेध करत आहोत. समस्त विज्ञान प्रेमी समाजही या निर्णयाबद्दल नाराज आहे, याची दखल घ्यावी. तेव्हा आपल्या या चुकीच्या निर्णयाचा आपण फेरविचार करावा, ही विनंती.”