ओढ्याच्या पाण्यातून कचरा, सांडपाणी वाहतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र सांगली जिल्ह्यातील आटपाडी या शहरात लोकांना चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहताना दिसून आल्या. नागरिकांनी ते मिळवण्यासाठी ओढ्यात शोधाशोध केल्याचे एका व्हिडीओत दिसून येत आहे.

आटपाडीत शनिवारचा बाजार होता. आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहत आल्या. आटपाडीतील शनिवारच्या बाजारासाठी आलेल्या लोकांना या नोटा ओढ्यात सापडल्या. अनेक लोक नोटांची शोधाशोध करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. पाण्यात हात घालून, कचरा बाहेर फेकून पैसे मिळतात की नाही ते बघत होते. अनेकांना केवळ पाचशे रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या.

हेही वाचा – ‘बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध’, लॉरेन्स बिश्नोईच्या शुटरचे धक्कादायक दावे; तर नाना पटोले म्हणतात, ‘दाल मे कुछ काला’

हेही वाचा – Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

ओढ्याजवळ बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लोक कचरा साचलेल्या ओढ्यात पैशांची शोधाशोध करत होते. ५०० रुपयांच्या नोटा मिळातात की काय ? या उत्सुकतेने लोक ओढ्याकडे बघत होते. एक महिला नोट दाखवत असल्याचे व्हिडीओत दिसून येते. नोट परत करणार असल्याचं देखील ती म्हणाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलीस काय म्हणाले?

आटपाडी पोलीस ठाणे हद्दीमधील गडी माडगुळकर पार्कला लागून असलेल्या ओढ्यात जुन्या नवीन बँक नोटा वाहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी जुन्या पाचशे रुपयांच्या १४ नोटा, एक हजार रुपयांची जुनी एक नोट, एकूण ८ हजार रुपयांच्या जुन्या नोटा. नवीन पाचशे रुपयांच्या ४ नोटा, पन्नास रुपयांच्या ३, १० रुपयांच्या अकरा, पाच रुपयांच्या २, आणि वीस रुपयांची १ नोट, अशा जुन्या नवीन एकूण दहा हजार २९० रुपयांच्या नोटा मिळून आल्या आहेत. नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी स्पेसिफाईड बँक नोट अ‍ॅक्ट २०१७ अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरू आहे. आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आटपाडी शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये. याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन विपुल पाटील, डेप्युटीएसपी, विटा, यांनी केले.