दिगंबर शिंदे
वर्षांनुवर्षांचे अवर्षण आणि पाण्याची सुबत्ता या परस्परविरोधी गोष्टींनी सांगली जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन नैसर्गिक विभाग तयार झाले आहेत. पश्चिम भागात बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नद्यांचा सुपीक भाग तर पूर्वकडे अल्प पावसाचा दुष्काळी पट्टा. मात्र, गेल्या दोन दशकामध्ये दुष्काळी पूर्व भागात ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ अशा सिंचन योजनांचे जाळे पसरले आणि येथील माळरानेही हिरव्या पिकांनी डोलू लागली. पाण्याच्या या उपलब्धतेमुळे ऊस पिकासोबतच द्राक्ष, डाळिंब पिकांनी जिल्ह्याला प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. मात्र रोजगाराची संधी वाढवू शकणारे औद्योगिक क्षेत्राचा विकास न झाल्याने जिल्ह्याच्या विकासाची गाडी काहीशी मागे पडल्यासारखी आहे.
जागतिक पातळीवर हळदीचे गाव (टरमरिक सिटी) म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगलीच्या बाजारातील हळदीच्या दरावर या ‘पिवळय़ा सोन्या’चे जागतिक दर निश्चित होतात. खरेतर सांगलीचे सगळे अर्थकारणच हळद, ऊस आणि बेदाणा या तीन उत्पादनावर अवलंबून आहे. हळदीची खरेदी विक्री करणारी देशपातळीवरील सर्वात मोठी बाजारपेठ सांगलीत असल्याने हळदीवर प्रक्रिया करणारे कारखाने देखील या ठिकाणी आहेत.
जिल्ह्याचा मिरज, सांगली, वाळवा, शिराळा, पलूस हा पश्चिम भाग हा नदीकाठी. यामुळे कृष्णा-वारणा खोऱ्यातील बारमाही पाण्यावर या परिसरातील शेती पहिल्यापासूनच बहरली. ऊस शेतीमुळे या भागात वाळवा, क्रांती, विश्वास, सोनहिरा असे सहकारी साखर कारखान्यांचे एक मोठे जाळेच तयार झाले. या कारखान्यांनी पुन्हा त्या-त्या भागातील अर्थव्यवस्थेला गती दिली. नदीकाठच्या या तालुक्यांनी उसाबरोबरच दुग्ध उत्पादनातही पहिल्यापासून आघाडी घेतली. येथील भिलवडीचा चितळे प्रकल्प याच श्वेत क्रांतीचे फलित. दुधाच्या या व्यवसायाने देखील हजारो कुटुंबांना रोजगार दिला. एकूणच नदीकाठच्या या प्रदेशात ऊस आणि दुधाने मोठी घोडदौड केली.
या उलट जिल्ह्याचा पूर्व भाग हा पहिल्यापासून अवर्षणग्रस्त. मिरजेचा पूर्व भाग, तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके पाण्यासाठी कायम आसुसलेले. निसर्गाचा अन्याय आणि शासनव्यवस्थेचीही उपेक्षा यामुळे इथला संघर्ष हा जगण्याचाच होता. पावसावरची शेती, पशुपालन अशी तुटपुंजी रोजगाराची साधने. ती देखील संपली की जगण्यासाठी स्थलांतर हाच तो काय मार्ग. सांगलीच्या याच दुष्काळी पट्टय़ात गेल्या दोन दशकांमध्ये ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ अशा एकापाठोपाठ एक सिंचन योजना साकारल्या आणि इथले चित्र पालटले. इथे वाहू लागलेल्या पाण्यातून दुष्काळी माळांवरही हिरवीगार पिके डोलू लागली. सांगलीच्या बदललेल्या चेहऱ्याचे हेच ठसठशीत उदाहरण आहे. दुष्काळी भागात आज या सिंचन योजनांमुळे उसासोबतच फळबागांनी बहर पकडला आहे. तासगावच्या द्राक्ष आणि बेदाण्याने जगभर आपली ओळख तयार केली आहे. अगदी लंडनच्या साहेबाच्या टेबलावर या द्राक्षांना मान मिळू लागला आहे. द्राक्षासोबतच आता येथील शेतकरी बेदाणा उत्पादनाकडे वळला आहे. दर्जेदार बेदाण्याची मोठी उपलब्धता या जिल्ह्यातून होत आहे. तासगावच्या या बेदाण्याला हळदीसोबत भौगोलिक मानांकनही मिळाल्यामुळे जागतिक बाजारपेठही मिळाली. बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृहांची साखळीही निर्माण झाली असून तोही एक व्यवसाय नव्याने निर्माण झाला आहे.
कमी पावसाच्या या प्रदेशात रसदार डाळिंबानेही आता चांगलेच पाय रोवले आहेत. आटपाडीतील गणेश, भगवा या डाळिंबाच्या जातींनी परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. हाच प्रकार आंब्याबाबत. या भागात पिकवल्या जाणाऱ्या आंब्याची चव आणि टिकाऊपणा अधिक असल्याने या दुष्काळी पट्टय़ातून त्याची थेट निर्यात होऊ लागली आहे. केवळ पाणी मिळू लागल्याने घडलेला हा बदल. सिंचन योजनांची क्रांती. इथली शेती देखील आता शाश्वत रोजगाराची बनली आहे. दुष्काळाच्या परंपरेतून जन्माला आलेला येथील शेळीमेंढी पालन व्यवसायदेखील राज्यभर प्रसिद्ध आहे. लोकरीसोबतच येथील माडग्याळी मेंढी मांसासाठी सर्वत्र प्रसिध्द आहे. या व्यवसायातूनही दुष्काळी पट्टय़ातील अनेक कुटुंबांनी प्रगती साधली आहे.
उद्योगात पिछाडी
सिंचनाच्या जाळय़ातून कृषी क्षेत्रात विकास साधणाऱ्या जिल्ह्याची औद्योगिक क्षेत्रात मात्र पिछाडी आहे. जिल्ह्याच्या नावावर ९ औद्योगिक वसाहती आहेत. परंतु सांगली, मिरज आणि कुपवाड वगळता अन्य वसाहती आज केवळ आरक्षित जमिनींचे पट्टे आहेत. विटय़ाचा वस्त्रोद्योग तो काय एक उद्योगाचा महत्त्वाचा थांबा. पण त्याचाही विस्तार अन्यत्र झालेला नाही. खरेतर या भागात कृषी प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना खूप सारा वाव. दुसरीकडे उद्योगासाठी आवश्यक पाणी, वीज, जमीन, मनुष्यबळ, रस्ते, महामार्गाचे जाळे, रेल्वेमार्गाची सुविधा असे सारे काही उपलब्ध असताना या भूमीत यंत्रांची चाके काही फारशी फिरली नाहीत. आज जिल्ह्यातील घरटी एक व्यक्ती रोजगारासाठी अन्य मोठय़ा शहरात स्थलांतरित झालेली आहे. हेच उद्योगांचे जाळे जर व्यवस्थित विणले असते तर हे मोठय़ा प्रमाणातील मानवी स्थलांतरही रोखण्यास मदत झाली असती.
महामार्गाचे जाळे
जिल्ह्यातून देशातील एक महत्त्वाचा पुणे-बंगळूरु महामार्ग जातो. शिवाय जिल्ह्याच्या विविध भागातून सध्या चार महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. पुणे-बंगळूरु हरित महामार्ग, रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर आणि मनमाड-विजापूर असे हे चार महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकतात. हे चारही महामार्ग जिल्ह्याच्या दुष्काळी पट्टय़ातून जात आहेत हेही विशेष. ही कृती जिल्ह्याच्या विकासाला आणि शेती उत्पादन निर्यातीला पूरक ठरणारी आहे. यावर लक्ष केंद्रित केले तर मानवी विकासदर वाढीचा वेग अधिक चांगला होऊ शकतो.