सांगली : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची धांदल उडाली असून, गणेश मूर्ती विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा बँकेसमोर असलेल्या सेवा रस्त्यावर दुकाने मांडण्यात आली आहेत. तर पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मारुती चौक, विश्रामबागमधील गणेश मंदिर आदी ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात शुक्रवारी सायंकाळी श्रींच्या मूर्तीचे आगमन झाले.

सांगलीचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या स्वागताला गणेशभक्त आतुर झाले असून, उद्या होणाऱ्या श्रींच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे. सांगली शहरातील कर्मवीर चौक, गणपती पेठ, विश्रामबागमधील गणेश मंदिर आदी ठिकाणासह गावभागात गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल मांडण्यात आले आहेत. आज गणेश मूर्ती पाहून ठरविण्यासाठी गणेशभक्त सहकुटुंब स्टॉलकडे येत होते. एक फुटापासून आठ फुटांपर्यंत स्टॉलवर मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून, अकराशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. श्रींच्या मूर्तीमधील वैशिष्ट्य, रंगसंगती याची पाहणी करून गणेशभक्त मूर्तीची निवड करत असल्याचे तानाजी कुंभार या मूर्तिकाराने सांगितले.

हेही वाचा – Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…

शहरातील दत्त-मारुती रस्त्यावर उत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यविक्रेत्यांचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात आहेत. थर्माकॉलची कमान, लाकडी व प्लायवूडचे सजवलेले श्रींचे आसन, प्लॅस्टिकची फुले, माळा, सजावटीचे विद्युत साहित्य यांची रेलचेल बाजारात पाहण्यास मिळाली. यंदा पाऊसकाळ समाधानकारक झाला असून, महापुरापासून सांगलीचा बचाव झाल्याने गणेशभक्तांमध्येही उत्साह दिसून येत आहे. मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात सजावट साहित्य विक्रेत्यांनी आपले स्टॉल मांडले असून, गणेशमूर्तीपुढे ठेवण्यासाठी फळे, उदबत्ती, नारळ यांचीही विक्री सुरू आहे.

हेही वाचा – CM Ekath Shinde : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मंडप व स्वागतकमान उभारणीसाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने ही सवलत दिली आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगलीतील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करून योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.