सांगली : बेदाणा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ‘फार्मर प्रोड्यूसर कंपनी’च्या नावाखाली एचडीएफसी बँकेची दोन कोटींची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या नावाने बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारणीसाठी एचडीएफसी बँकेच्या सांगली शाखेकडून ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधून १ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज घेतले. बँकेने कंपनीने सुचविलेले पुरवठादार गौरी कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मूव्हर्स पुणे, एस.जे.एम.एम. असोसिएटस अँड मल्टि सर्व्हिसेस, सांगली आणि शुभ गणेश ॲग्रो इंडस्ट्रिज या तीन कंपन्यांच्या नावे कर्ज रक्कम वितरीत केली. सदर प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे जमा करणे गरजेचे होते. २३ नोव्हेंबर २०२२ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली असून आजतागायत हा प्रकल्प उभारलेला नाही. यामुळे बँकेची फसवणूक झाली असल्याचे बँंकेचे अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…सांगली जिल्हा बँकेच्या वसुली मोहीम विरोधात आंदोलन
या प्रकरणी मुकुंद जाधवर, स्वप्नाली जाधव, सखुबाई जाधवर (तिघे रा. बालवाड जि. सोलापूर), विजय कराड (रा. भालगाव सोलापूर), सांगली जिल्ह्यातील राजाराम खरात (एरंडोली), अजित दळवी (बेडग) आणि लता जाधव (रा. पायाप्पावाडी) अशा कंपनीच्या सात संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद जाधवर हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.