सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. त्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांचा प्रचारही सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसचे आदी नेते उपस्थित होते. या मेळाव्यात विशाल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाषण सुरु होण्याआधी काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. या बॅनरवर लिहिलेले होते की, ‘कार्यकर्त्यांना काय पाहिजे? विश्वजीत कदमांची साथ पाहिजे, आमच्या रक्तात काँग्रेस, मग विश्वजीत कदमांचा मान का ठेवला नाही?’, अशी बॅनरबाजी यावेळी करण्यात आली. तसेच विश्वजीत कदम तुम आगे बडो…अशी जोरदार घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा : आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर आपण विश्वजीत कदम यांच्याबरोबर असून त्यांच्या मताचे मी पूर्णपणे समर्थन करतो. ज्या प्रमाणे विश्वजीत कदम यांनी भावना मांडल्या, त्या भावनेचं मी समर्थन करतो”, असे नाना पटोले कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत “वरिष्ठ नेत्यांनी आमच्या भावना समजून घ्यायला हव्या”, असे म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावरुन खाली जात कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आवाहन करत त्यांची समजूत काढली.

Story img Loader