२१ जागांसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून संचालकांच्या २१ जागांसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीमध्ये २ हजार २१९ संस्था प्रतिनिधी तर तर ३५४ वैयक्तिक मतदार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांनी बुधवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आजपासून २२ ऑक्टोबरपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी २५ ऑक्टोबर रोजी, तर अर्ज माघारीची मुदत ९ नोव्हेंबर ही आहे. मतदान २१ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सध्या बँकेचे संचालक मंडळामध्ये सर्व पक्षीय सदस्य असले तरी गेल्या साडेसहा वर्षांतील एक हाती कारभारामुळे संचालक मंडळामध्ये विसंवाद निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही याच पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी अवाजवी खर्चाबाबत सहकार खात्याकडे तक्रार केल्याने बँकेचा कारभार पुन्हा चर्चेत आला. याशिवाय अखेरच्या संचालक मंडळाच्या बैठकीतून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच गायब करण्याचा प्रकार संचालक तथा खा. संजयकाका पाटील यांनी केला, तर केन अॅग्रो कारखान्याच्या थकबाकीवरून काँग्रेसच्या दोन आमदारासह खासदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
संचालक मंडळात निर्माण झालेल्या विसंवादाच्या पाश्र्वाभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अविरोध निवड करण्याच्या प्रयत्नात आडकाठी निर्माण झाली आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वाजित कदम, पालकमंत्री पाटील यांनी निवडणुकीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र गेल्या महिन्यापासून चालू असलेल्या हालचालीनुसार भाजपला दोन, शिवसेनेला दोन आणि काँग्रेसला सहा जागा देऊन अविरोध निवडणूक करण्याचे डावपेच राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, भाजपची सात जागांची मागणी असून काँग्रेसही तेवढ्या जागांची मागणी करीत आहे. यामुळे निवडणूक लागण्याचीच चिन्हे आहेत.