सांगली : जिल्हा बँकेचे काम राज्यात आदर्शवत असून सामान्य लोकांचा कारभारावर विश्वास असल्याने ठेवीमध्ये लक्षणीय वाढ झाली. मात्र, विरोधक केवळ टीका व वल्गना करून दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. बँकेत चुकीचे काम होउ दिले जात नाही. जर प्रयत्न झालाच तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी शिराळा येथे केले.
शिराळा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम, बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, चिमण डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा : “मराठा आंदोलन भरकटलंय”, वरिष्ठ भाजपा नेत्याचं वक्तव्य; मनोज जरांगे संतापून म्हणाले, “तुमच्यासारख्यांमुळे…”
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे कामकाज नियम व कायद्यानुसारच चालविले पाहिजे. बँकेचा उपयोग राजकीय चढाओढीसाठी, राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी होता कामा नये. सांगली जिल्हा बँकेची प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावा अशीच आहे. सामान्य माणसाच्या विकासाचे साधन असल्याने बँक चांगल्या पध्दतीनेच चालली पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, ही बँक शेतकर्यांची अर्थवाहिनी आहे. बँकेचा फायदा न पाहता शेतकर्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम करताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. व्यवहाराभिमुख निर्णय घेतले गेल्याने बँकेच्या ठेवीमध्ये गेल्या दोन वर्षात वाढ झाली असून हे विश्वासाचेच प्रतिक आहे. यावेळी बँकेचे संचालक महेंद्र लाड, पृथ्वीराज पाटील, संग्रामसिंह देशमुख, अनिता सगरे, बाळासाहेब पाटील, वैभव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते.