ऊसदराबाबत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सांगली जिल्हा दि. ३० नोव्हेंबपर्यंत अशांत जिल्हा म्हणून जिल्हाधिकाऱ्यानी जाहीर केला असून, त्यामुळे आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त अधिकार मिळाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली पोलिसांनी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निवासस्थानावर बंदोबस्त ठेवला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी आरपार लढय़ाची घोषणा केली असून, ठिकठिकाणी हिंसक आंदोलने होत आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी अशांत जिल्हा म्हणून घोषित केला आहे. आंदोलनाचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिसांच्या रजा, सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा तनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनकाळात आंदोलकांकडून होणारे नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याचे अधिकार प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. वसुलीसाठी मालमत्तेवरही बोजा चढवला जाऊ शकतो.
    शनिवारी नांद्रे, वसगडे दरम्यान ६ बसवर झालेल्या दगडफेकप्रकरणी संशयितांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली असल्याचे पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले. जिल्हा पोलिस दलाकडे जमावाला आटोक्यात आणण्यासाठी प्लॅस्टिक व रबरी गोळय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या गोळय़ांमुळे दंगलखोर किरकोळ स्वरूपात जखमी होऊ शकतात.  
    गतवर्षी पोलिसी गोळीबारात वसगडे येथील शेतकरी चंद्रकांत नलवडे याचा गोळीबारात मृत्यू झाला  होता. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलनावेळी रबरी व प्लॅस्टिकच्या गोळय़ा वापरण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत.

Story img Loader