सांंगली : तासगाव-सातारा रस्त्यावरील येरळा नदीला आलेल्या पुरात एक वृद्ध दाम्पत्य बेपत्ता झाले असून मंगळवारी दिवसभर एनडीआरएफ पथकाला दोघांचा शोध लागलेला नाही. दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली असून त्यांची दुचाकीही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील (तांदळे वस्ती) पुलावरून वृद्ध दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर आज पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, कोणीही मिळाले नाही.
पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या व्यक्ती कोण होत्या याची माहिती मात्र अद्याप मिळाली नसली तरी हे दोघेही वाठार स्टेशन येथील दाम्पत्य असल्याची अनधिकृत माहिती चर्चेतून पुढे आली. मात्र, याबाबत पोलिसांनाही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
हेही वाचा – सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
गेल्या चार दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे येरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने नदीपुलावरील वाहतूक बंद होती. मात्र पुलावरील पाणी कमी होताच काही वाहने ये-जा करीत होती. रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसाने नदीवरील पुलाच्या पाणी पातळीत वाढ झाली. सोमवारी संध्याकाळी नदीकाठावर नदी पार करून जाण्यासाठी काहीजण दुचाकीसह थांबून होते, पण कोणाचे धाडस होत नव्हते. याचवेळी एक वृद्ध दाम्पत्य दुचाकीवरून या ठिकाणी आले. त्यावेळी काही जणांनी या दाम्पत्याला, नदीला पाणी जास्त आहे, तुम्ही नदी पार करू नका, असे सांगितले. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या दाम्पत्याने नदीपुलावरून दुचाकी दामटली. आणि पुढे जाऊ लागले. पुलाच्या मध्यावर येताच चालकाच्या हातून दुचाकी निसटली आणि हे दाम्पत्य तोल जाऊन पाण्यात पडले. काही क्षणात ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.
नदीकाठच्या रहिवाशांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि तहसीलदार अतुल पाटोळे यांना माहिती दिली. एनडीआरएफच्या पथकाला बोलावले. वीस जवानांच्या दोन पथकाने नदीपात्रात काल तीन तास आणि आज दिवसभर शोधमोहीम राबवली. मात्र, बेपत्ता झालेल्यांचा शोध लागला नाही.