सांगली : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील विसर्ग सुरू झाल्याने सांगलीच्या पूरबाधित क्षेत्रात बुधवारी पाणी शिरले. यामुळे सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी रहिवाशी क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले. महापालिकेने येथील रहिवाशांची संजयनगरमध्ये निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे. दरम्यान, चांदोली धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला असून हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमानजीक पाणी शेतात शिरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असून यामुळे कृष्णा-वारणेसह ओढे दुथडी भरून वाहत आहेत. गावच्या पाणंद रस्त्यावर पाणी आल्याने वस्तीवरील लोकांची येजा थांबली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा-मोरणा नद्यांना महापूर आला आहे. यातच चांदोली धरणातील विसर्ग ३८०० वरून बुधवारी सकाळी साडेअकरा वाजलेपासून ८८७४ क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर पडून बाजूच्या शेतात शिरले आहे. कोकरूड-शाहूवाडी, कांदे-मागले, अमृतनगर-ऐतवडे हे मार्ग बंद झाले आहेत. वारणेवरील सर्व बंधारे आणि कृष्णेवरील नागठाणे, कसबे डिग्रज, सांगली व म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हेही वाचा – सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर; उजनीत वाढतोय पाणीसाठा
सांगली शहरातील आयर्विन पूलाजवळ पाणी पातळी दुपारी ४ वाजता ३० फूट ४ इंचावर पोहोचली असून या ठिकाणी इशारा पातळी ४० तर धोका पातळी ४५ फूट आहे. सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरल्याने आज आरवाडे पार्कमधील ३ कुटुंबांतील ३ पुरुष, पाच महिला व ९ मुलांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. इनामदार प्लॉट, शिवनगर, कर्नाळ रोड आदी परिसरातील नागरिक प्रापंचिक साहित्य घेऊन स्थलांतराच्या तयारीत आहेत.
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २९.२८ तर कोयना धरणामध्ये ६८.८३ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १७.४ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १४.१, जत ४.७, खानापूर-विटा १३.२, वाळवा-इस्लामपूर २६, तासगाव १४.६, आटपाडी १.७, कवठेमहांकाळ ८.२, पलूस १६.१ आणि कडेगाव २१.७.
सांगली, कोल्हापूरचा पूर धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सायंकाळी ७ वाजल्यापासून २ लाख २५ हजार क्युसेक प्रती सेकंद विसर्ग करण्यात येत आहे.