सांंगली : फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने ट्रकची विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबरप्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने सोमवारी उघडकीस आला.
यशवंत गडदे (रा. गोंडवाडी, ता. सांगोला) यांचा ट्रक मिरज-पंढरपूर रस्त्यावरील शेतकरी ढाबा येथून दि.११ जुलै रोजी चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी संकेत मगदूम, अमोल ऐदळे, सोमनाथ गुंडे हे करत असताना विश्रामबाग येथे संशयास्पद ट्रक लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता ट्रकच्या नंबरप्लेटवर काळा रंग लावण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद वावरत असताना बिरदेव गडदे व गणेश भोसले यांना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – सांगली : कोयनेतून विसर्ग नसताना कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ
हेही वाचा – सांगली : पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रात स्थलांतराचे आवाहन
यातील गडदे याने चुलता यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून मालट्रक (एमएच ५०-४८७५) खरेदी केला होता. कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांने हा ट्रक मोहन शेंबडे यांना विकला. यानंतर मित्र भोसले याच्या मालकीचा ट्रक (एमएच १० झेड ४५८४) हा मिरज पंढरपूर रोडवर विकलेल्या ट्रकचा नंबर लावून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद चुलत्याला देण्यास सांगितले होते. मात्र, मूळ ट्रकची विक्री करून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद देऊन फायनान्स कंपनीचा चुलत्यामागे लागलेला तगादा चुकविण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे.