सांगली : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या नेर्ले (ता. वाळवा) येथील आदिती फूडस् इंडिया कंपनीच्या गोदामाला गुरूवारी सकाळी आग लागून सुमारे एक कोटींचे खाद्य पदार्थ जळून खाक झाले. ही आग विज वाहक तारेमधून पडलेल्या ठिणगीने लागली असल्याचा कयास असला तरी नेमके आगीमागील कारण अस्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेर्ले (ता. वाळवा) येथे आदिती फूडस् इंडिया या कंपनीचा खाद्य पदार्थ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात फळ प्रक्रिया करून खाद्य पदार्थ तयार केले जातात. मँगो पल्प, टोमॅटो केचप, चॉकलेट आदींचे उत्पादन करून या पदार्थाची निर्यात केली जाते. तयार झालेला माल कारखान्या शेजारी असलेल्या गोदामात साठवणुकीसाठी ठेवला जातो.

आज सकाळी सहा वाजणेच्या सुमारास कारखान्याच्या पेठ गावच्या हद्दीत असलेल्या गोदामातून धूर येत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले.आग कुठे लागली हे पाहत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले. गोदामच आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. गोदामातून धूराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या.

आग लागल्याची माहिती मिळताच इस्लामपूर आणि आष्टा नगरपालिकेसह राजारामबापू, हुतात्मा आणि विश्‍वास सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही खासगी पाण्याचे टँकर मागविण्यात आले. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळाले.

आगीचे कारण अस्पष्ट असले तरी विज प्रवाहाचे शार्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत सुमारे एक कोटींचे निर्यात खाद्य पदार्थांचा साठा जळून खाक झाला असावा असेही सांगण्यात आले.