सांगली : राज्यभरात वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून पाठबळ देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सांगलीत ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. कच्छी जैन भवन येथे आयोजित या ग्रंथोत्सवास खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य अविनाश सप्रे, सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ग्रंथालय अधिनियमात बदल करून ई पुस्तक संज्ञा स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे ग्रंथालयांना ई पुस्तक खरेदी करण्यास वाव मिळाला. त्यामुळे वाचनसंस्कृती घटतेय, यावर चिंतन करण्यापेक्षा खऱ्या वाचकांवर लक्ष केंद्रित करून त्यांची संख्या वाढवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद करावेत. आपली स्वत:ची ६ फिरती वाचनालये पुणे व कोल्हापुरात कार्यान्वित असून, सांगलीतही फिरत्या वाचनालयाची संकल्पना साकार करावी. वाचन विश्व समृद्ध करावे. अशा ग्रंथप्रदर्शनातून पुस्तक खरेदी करून जिल्हा परिषद शाळांना ती भेट स्वरूपात द्यावीत, असेही ते म्हणाले.

वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा मानस व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले, राज्यात २०१२ पासून नव्या ग्रंथालयांना परवानगी बंद आहे. राज्यात सध्या ११ हजार ग्रंथालये चालू स्थितीत सुरू आहेत. तर दोन हजार ग्रंथालये बंद आहेत. त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी दोन हजार नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्याची कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचित केले. तसेच, ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ, आमदार निधीतून ग्रंथालयांना पुस्तके वितरण, ग्रंथालयांची श्रेणीवाढ आदींबाबत कार्यवाही सुरू आहे. प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार अमित सोनवणे यांनी मानले.

Story img Loader