सांगली : अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी शाळेत शपथ देण्याचा विचार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. समाजात वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उपअधिक्षकांची कृती समिती स्थापन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्ये वाढली असून मनुष्यवधाच्या गुन्ह्यातही अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक असून याबाबत कायद्यात दुरूस्ती करावी लागणार आहे. यावर शासन गांभीर्याने विचार करत आहे. शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळांमध्ये याबाबत शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने दररोज प्रार्थनेच्या वेळेला विद्यार्थ्यांना एक शपथ घेतली जावी असा विचार सुरू आहे. या शपथेमध्ये मी नशा करणार नाही आणि माझ्या भोवताली या अंमली पदार्थाबाबत मला जे जे दिसेल ते मी माझ्या शिक्षक, पालकांना सांगेन अशा आशयाची ही शपथ असेल. तसेच प्रत्येक दिवशी दहा मिनिटं अमली पदार्थाचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सगळ्या वर्गामध्ये मार्गदर्शन करावे असा उपक्रम राबवण्याचा विचार असून याबाबत शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर केला आहे असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना जी काही साधने हवी असतील त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत केली जाईल. याबाबत गृह विभागाकडून काय करता येईल यावर अहवाल तयार करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उप अधिक्षकांची कृती समिती टास्क फोर्स म्हणजेच कृती समिती स्थापन करण्यात आली असून आठवडाभरात ही समिती आपला अहवाल सादर करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते.

Story img Loader