सांगली : अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिले. पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना कवलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले.
कवलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सांगली जिह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्त्वाचे आहे. विमानतळ होण्यासाठी १६० एकर जमीनही आरक्षित आहे. यापूर्वी अनेकवेळा मंत्री आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणीही झाली आहे. पण आजतागायत विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत, असा उल्लेख प्रा. वनखंडे यांनी या निवेदनात केला आहे.
हेही वाचा – सांगली : शालेय गणवेश शिलाईतून ३७५ महिलांना रोजगार
सांगली जिल्हा हा कृषीसंपन्न आहे. येथील बेदाणा, हळद यासह अनेक शेती उत्पादीत वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात. मिरज हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे आरोग्य केंद्र आहे. येथे देश-विदेशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. सांगली-मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रही चांगल्या स्वरुपात आहे. शिवाय हा भाग कर्नाटकशी संलग्न आहे. याचा विचार करुन कवलापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार आरक्षित जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करुन विमानतळ मंजूर करावे, असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहणीचे नियोजन करण्याच्या सुचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे प्रा. वनखंडे यांनी सांगितले.