सांगली : हजरजबाबीपणा आणि विनोदाची सांगड घालत रंगलेल्या हास्यजत्रेचा कार्यक्रम, स्वप्नील गोडबोलेचे सुमधूर गायन, नृत्यांगणा मिरा जोशीचा भन्नाट नृत्याविष्कार आणि सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे ओघवते निवेदन, अशी त्रिवेणी संगमातील कलेची तीन तास इस्लामपूरकरांना मेजवाणी लाभली.

आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका सादर करणारे कलाकार समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनी इस्लामपूरकर कलारसिकांना तीन तास खळखळून हसविले. समीर चौघुले व चेतना भट यांची कॉफी हाऊसमधील पहिली भेट, तसेच खेळ पैठणीचा या किस्स्याने रसिकांना पोट धरून हसविले. प्रसाद खांडेकर यांनी नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्यासाठी आणलेला बंपर सेल अफलातून झाला. तर प्रथमेश शिवलकर या शिक्षकाची दत्तू मोरे या विद्यार्थ्यांबद्दल प्रभाकर मोरे, रसिका वेंगुर्लेकर या आई-वडिलांची तक्रार हसविणारी होती.

युवा गायक स्वप्नील गोडबोले, मुग्धा कराडे यांनी श्रीगणेशाने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने समारोप केले. दरम्यान त्यांनी राधा ही बावरी, मला वेड लागले आदी मराठी गाणी सादर केली. प्रसिद्ध नृत्यांगना मिरा जोशी यांच्या चंद्रासह इतर लावण्यावर बहारदार नृत्याविष्कार झाला. सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते ’हास्यजत्राच्या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात कलारसिकांच्या अखंड पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Story img Loader