सांगली : सांगली, जत, खानापूर याठिकाणी बंडखोरी झाली असून अन्य ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती होत आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील आठही मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मार्ग सुकर झाला असून जतमध्ये महायुतीला तर सांगली, खानापूरमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
सांगली मतदार संघातून महायुतीचे आ. सुधीर गाडगीळ, महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील व काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी भाजपचे शिवाजी डोंगरेसह अन्य उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे काँग्रेस उमेदवार पाटील यांच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
जतमध्ये भाजपचे प्रचार प्रमुख तमणगोंडा रवि पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी अखेरच्या टप्प्यात आपली उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपअंतर्गत विरोधकांनी रवि पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून या ठिकाणी काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांना भाजपचे आमदार पडळकर व बंडखोर रवि पाटील यांच्याशी सामना करावा लागणार आहे.
खानापूर मतदार संघातून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, आघाडीतून वैभव पाटील यांना संधी देण्यात आल्याने देशमुखांनी आटपाडीच्या स्वाभिमानासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांची उमेदवारी कायम असल्याने या ठिकाणी महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे सुहास बाबर, महाविकास आघाडीचे वैभव पाटील आणि अपक्ष देशमुख असा तिरंगी सामना होत आहे.
हेही वाचा : बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
मिरज मतदार संघातून काँग्रेसचे बंडखोर मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांनी माघार घेतली असून मिरज मतदार संघामध्ये महायुतीचे पालकमंत्री सुरेश खाडे, महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते आणि एमआयएमचे डॉ. महेश कांबळे अशी तिरंगी लढत होत आहे. इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.