सांगली : हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतिक असलेला कडेगावचा गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली. संस्थान काळापासून कडेगावचा ताबूत भेटीचा सोहळा गगनचुंबी ताबूतासाठी प्रसिध्द आहे. श्रीमंत भाउसाहेब देशपांडे यांनी या सोहळ्यास स्वातंत्र्यपूर्व काळात सुरूवात केली. ही परंपरा आजही पाळण्यात येते. मोहरम हा मुस्लिम समाजाचा सण असला तरी या सणाचा मान हिंदूंकडे आहे.
मोहरमनिमित्त काव्यरचना करत हिंदू-मुस्लिम ऐक्य घडविण्याचे काम तत्कालिन संत सय्यदपीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले. १८८५ पासून उंच ताबूत बसविण्याची प्रथा सुरू करण्यात आली. या ताबूताची उंची ११० ते १३५ फूटापर्यंत असते. या ताबूत निर्मितीचे वैशिष्ट म्हणजे आदी कळस मग पाया अशा पध्दतीने बांधणी केली जाते.
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
प्रथम पाटील वाड्यात ताबूत आल्यानंतर गाणी म्हटली जातात. उंच ताबूत भेटीचा मुख्य सोहळा सुरेशबाबू देशमुख चौकामध्ये पार पाडला जातो. यावेळी तालुययासह जिल्ह्याच्या अनेक भागातील लोक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात.
हेही वाचा…Video:अमृता फडणवीस यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, खास व्हिडीओ चर्चेत
आज मोहरम निमित्त कडेगावमध्ये झालेल्या ताबूत भेटीच्या सोहळ्यासाठी आमदार विश्वजित कदम, खा. विशाल पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख आदीसह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपंचायतीनेही मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, रस्ते दुरूस्ती केली होती. ताबूत भेटीचा सोहळ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
© The Indian Express (P) Ltd