अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कर्नाटकातील तरूणास  जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा आज (सोमवार) सुनावली.

सालगडी म्हणून आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथील एका शेतात कामास असलेला विष्णु माडेकर (वय २३) याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी आज सुनावली.

पिडीत मुलगी ६ जून २०१८ रोजी रूग्णालयात मळमळ व उलटी होत असल्याने उपचारासाठी गेली असता ती दोन महिन्याची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते. त्यानंतर पिडीतेच्या आईने संशयिताविरूध्द आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पोलीसांनी डीएनए चाचणी केली होती. वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक तज्ञांचा अहवाल आणि अन्य १५ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. दरम्यानच्या काळात पिडीत मुलीचा कायदेशीर मार्गाने गर्भपात करण्यात आला.

Story img Loader