सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका वस्तीशाळेत चौथीमध्ये शिकत असलेल्या तीन मुलींचा शिक्षकाने विनयभंग करण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला असून पालकांनी शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे.
हेही वाचा : सांगली: मिरजेतील श्रीमंत महागणपती मंडळाची २१ फूट उंचीची फायबरची गणेशमूर्ती; मूर्ती २५ वर्षे टिकणार
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका वस्ती शाळेत हा प्रकार घडला. मुलींनी गुरुजी करत असलेले हावभाव पालकांना सांगितले. पालकांनी सोमवारी प्रत्यक्ष खातरजमा केली. यानंतर संबंधित शिक्षकाला शाळेतच चोप देत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले असून एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कवठेमहांकाळ गटशिक्षणाधिकारी यांना वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त होताच सायंकाळी या शिक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे.