सांगली : जलप्रदुषणाबद्दल हरित लवादाने लाखो रूपयांचा दंड ठोठावल्यानंतरही ओढा पात्रातून दुषित पाणी सोडण्यात आल्याने लाखो माशांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा नदीतील जलचरांवर याचा परिणाम होत असून मृत मासे काही नागरिक खाण्यासाठी नेत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तरी याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाने प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

नवे खेड (ता. वाळवा) ओढा पात्रातून कारखान्याकडून दुषित पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रासह ओढा पात्रातील लाखो मासे मृत होत असल्याचे गुरूवारी समोर आले. मृत माशांचा थर पात्रातील पाण्यावर पसरला आहे. वारंवार होत असलेल्या या घटनामुळे हरित लवादाकडे दाद मागण्यात आली होती. त्यावेळी लवादाने हुतात्मा कारखाना, राजारामबापू कारखाना आणि कृष्णा कारखाना यांच्या मद्यार्क आणि साखर विभागाला लाखो रूपये दंड ठोठावला. तरीही पुन्हा दुषित पाणी नदीत प्रक्रिया न करता तसेच सोडण्यात आले आहे.

या दुषित पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू झाला असून नदीतील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मळी मिश्रित पाणी सोडल्याने नदीकाठी वास्तव्य असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच मृत माशामुळे हवाही प्रदुषित होत आहे. तरी प्रदुषण नियंत्रण मंडळाने वारंवार घडणार्‍या या घटनांची गांभीर्याने दखल घेउन कठोर कारवाई करावी, अन्यथा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने करण्यात येईल असे निवेदन जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी गुरूवारी दिले.

Story img Loader