सांगली : सांगली लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होत असून स्व.अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातील पोट निवडणूक लोकसभेसोबत होणार नाही हे आज स्पष्ट झाले. सांगली मतदार संघातील मतदान ७ मे रोजी होत असून उमेदवारी अर्ज १२ ते १९ एप्रिल या कालावधीत दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी २० एप्रिलला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत २२ एप्रिल पर्यंत आहे. सात मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि. ४ जून रोजी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आ. अनिल बाबर यांच्या अकाली निधनाने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली असून याठिकाणी लोकसभेसोबत पोट निवडणूक होईल अशी अपेक्षा होती. निवडणूक आयोगाने तशा जिल्हा प्रशासनाला तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. पोट निवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही जिल्हा प्रशासनाने आणली आहेत. मात्र आता ही पोट निवडणूक लोकसभेसोबत होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले.

हेही वाचा…दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, “तिकिट वाटपात महिलांना डावललं जातं आहे, ४०० पारचं..”

दरम्यान, महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा पेच अद्याप कायम असून सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेने दावा केला आहे. भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून पक्षाने निवडणुकीच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीत जागा वाटप निश्‍चित झाल्याशिवाय उमेदवार जाहीर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. तर जागा वाटपानंतर सोमवारपर्यंत उमेदवारी जाहीर होईल असे विशाल पाटील यांनी शनिवारी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli lok sabha polls on may 7 khanapur atpadi assembly by election not to be held concurrently psg