गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज मुंबईच्या शिवालयमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मविआत कोणतेही मतभेद नसल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. तसेच, यावेळी तिन्ही पक्षांना कोणत्या जागा मिळाल्या याची यादीही जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते कोणता निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसमधून ज्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, ते विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
नेमका काय होता वाद?
सांगलीच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहास पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्याचवेळी सांगलीतून काँग्रेसमधून विशाल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. स्वत: विश्वजीत कदम यांचा विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतरही अंतिम जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटालाच जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता सांगली काँग्रेसमधून त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाना पटोले म्हणतात, “एक पाऊल मागे”
दरम्यान, सांगली किंवा इतर ठिकाणच्या जागांसंदर्भात नाना पटोले यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी यावर हायकमांडच्या आदेशानं सगळे काम करतील अशी प्रतिक्रिया दिली. “हायकमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतील. लोकशाही पद्धतीने संविधान वाचवण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला एक पाऊल मागे घ्यावं लागतं. त्यासंदर्भात आम्ही त्यांना समजावून सांगू”, असं यावेळी नाना पटोले म्हणाले. दरम्यान, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विशाल पाटलांच्या नाराजीविषयी विचारणा केली असता त्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुणाला कोणती जागा मिळाली?
जाहीर झालेल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला २१, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा असं जागावाटप निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यात ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ मिळाले आहेत. तर शरद पवार गटाला बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या जागा आल्या आहेत.