सांगली : शेतातील वहिवाट रस्त्याबद्दल विरोधात निकाल दिल्याच्या रागातून संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा ४८ तासांच्या आत खून करु अशी धमकी उमदी (ता. जत) येथील सुमित नाटीकर याने दिली आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर खुनाची धमकी पाठविली आहे. सुमित नाटीकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता. हा वाद अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता. त्यांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वांचे जबाब घेऊन एकाच सर्व्हे क्रमांकामध्ये सर्वांची शेती असल्याने नाटीकर याच्या शेतातून सामाईक रस्ता देण्याचा आदेश ४ महिन्यांपूर्वी काढला होता.

हेही वाचा – तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता ५०० रुपयांचा ऑनलाईन स्पेशल पास, ऑफलाईनबरोबरच मोबाईल अ‍ॅपवरूनही काढता येणार पास

हेही वाचा – पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस, श्रीनाथ भिमालेंची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

विरोधात निकाल दिला याचा राग मनात धरून नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर धमकीचे पत्र पाठविले. ४८ तासांच्या आत मागाडे यांचा खून करतो असा मेल केला. मागाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नाटीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.