सांगली : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस व जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई ह्या ४७० किलोमीटरच्या शहीद दौडला सोमवारी सकाळी सांगलीतून सुरुवात झाली. सांगलीतील शहीद अशोक कामटे फाउंडेशनकडून या शहीद दौडीचे आयोजन करण्यत येते. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे.
मुंबईत २६/११ मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलिस व जवानांना अभिवादन करण्यासाठी २०२१ पासून सांगली ते मुंबई अशी ४७० किलोमीटरची दौड सुरू करण्यात आली. आज पहाटे शहीदांना अभिवादन करून या दौडीस सुरुवात झाली. या दौडमध्ये मशाल व तिरंगा हाती घेत २५ धावपटू सहभागी झाले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी ही दौड मुंबईत पोहोचणार आहे. सांगली, तासगाव विटा मार्गे सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड २६ नोव्हेंबर रोजी दाखल होईल. याठिकाणी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दौडीचा समारोप आणि शहीदांना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे, असे आयोजक समित कदम यांनी सांगितले.