सांगली : राजकीय दबावामुळे रखडलेले सांगली बाजार समितीचे त्रिभाजन तातडीने करावे अशी आग्रही मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. आ. गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे, की सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी जत, मिरज आणि कवठेमहांकाळ अशा तीनही तालुक्यांची मिळून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली होती. परंतु कालांतराने या बाजार समितीचे विभाजन होणे अत्यावश्यक होते.

सन २००६ पासून हा विषय आणि त्रिभाजनाची मागणी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात सांगली चेंबर ऑफ कॉमर्सनेही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी केली आहे. न्यायालयानेही या संदर्भात शासनाला कार्यवाहीचे आदेश त्या वेळीच दिले होते; परंतु केवळ राजकीय दबावामुळे अद्यापि बाजार समितीचे त्रिभाजन झालेले नाही.

जत, कवठेमहांकाळ आणि मिरज या तीन तालुक्यांसाठी मिळून बाजार समिती स्थापन झालेली असली, तरी प्रामुख्याने बाजार समितीचा व्यवहार आणि शेतीमालाची आवक व विक्री ही सांगलीमध्येच होत असते. बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत सांगलीमध्येच आहे. परंतु जत आणि कवठेमहांकाळचा बाजार समितीत समावेश केल्यामुळे बाजार समितीला जत, ढालगाव आणि कवठेमहांकाळ येथील दुय्यम बाजारासाठी सांगलीतील उत्पन्नाच्या ८० टक्के हिस्सा अवाजवी खर्च करावा लागतो. परिणामी सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये अत्यावश्यक अशा नागरी सुविधा पुरवणेही बाजार समितीला शक्य होत नाही. त्यामुळे सांगली बाजारपेठेत येणारे शेतकरी, व्यापारी, तसेच अन्य कर्मचारी यांची सतत कुचंबणा होत आहे. त्यांच्यावर उघड उघड अन्याय होत आहे. याबाबत सकारात्मक भूमिका शासनाकडून घेण्याचे आश्वासन पणन मंत्री रावल यांनी दिले असल्याचे आ. गाडगीळ यांनी सांगितले.

Story img Loader