सांगली : सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले असून आता जत, कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने गुरुवारी प्रसिध्द केली. आ. सुधीर गाडगीळ यांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाची मागणी केली होती. शासनाच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी सांगितले.

सांगली बाजार समितीअंतर्गत जत व कवठेमहांकाळ या तालुक्यांचाही समावेश होता. सांगली बाजारातील उत्पन्न अधिक होते, तर या तुलनेत जत, कवठेमहांकाळ या तालुक्यातील उत्पन्न अल्प होते. सांगलीतील उत्पन्नापैकी ८० टक्के खर्च जत, कवठेमहांकाळ आणि ढालगाव उपबाजार समितीच्या देखरेखीवर होत होता. यामुळे सांगलीत सुविधा पुरवण्यावर मर्यादा येत होत्या. रस्ते, वीज या नागरी सुविधा पुरविण्यासाठी बाजार समितीकडे निधीची उणीव भासत असल्याने चेंबर ऑफ कॉमर्सने बाजार समितीचे त्रिभाजन करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीचा आ. गाडगीळ यांनी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात येत असल्याची अधिसूचना आज प्रसिध्द केली.

दरम्यान, याबाबत सभापती श्री. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बाजार समिती त्रिभाजनाबाबत शासनाच्या हालचाली सुरू असून हे त्रिभाजन आम्हाला अमान्य आहे. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आम्हाला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी दिली आहे. तरीही शासनाकडून त्रिभाजनासाठी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अद्याप त्रिभाजनाबाबत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत असेही त्यांनी सांगितले.