लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : कामावर असताना सफाई कर्मचारी व स्वच्छता निरीक्षकांनी गणवेशातच असले पाहिजे, अन्यथा दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत दिला.
महापालिकेच्या मंगलाधाम येथील कार्यालयात आज आयुक्त गुप्ता यांनी सर्व विभागाचा तपशीलवार आढावा घेतला. चारही प्रभागात अनुपस्थित राहणारे सफाई कर्मचारी यांना सहायक आयुक्तांनी नोटीस देऊन कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मुदतीत सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील अनधिकृत फलक, डिजिटल लावणारे यांच्यावर सहायक आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
सफाई कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांना गणवेश निश्चित करण्यात आला असून, कामावर रूजू असताना त्यांनी गणवेशातच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामावर गणवेशाविना जर कर्मचारी अथवा अधिकारी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शहरात पशूवैद्यकीय अधिकारी मानधनावर नियुक्त करण्याचे निर्देशही त्यांनी आस्थापना विभागाला दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव उपस्थित होते.