सांगली, मिरज व कुपवाड ही तीन शहरांची महापालिका म्हणून अस्तित्वात आली. या घटनेलाही आता २५ वर्षांहून अधिक काळ लोटला. नुकताच महापालिकेचा वर्धापन दिन साजरा झाला. एकीकडे नागरिकांच्या माथी कराचे ओझे टाकले असताना प्रशासन मात्र महापालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात मश्गूल होते. यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, मात्र वर्गणी काढून उत्सव साजरा करण्याऐवजी कराच्या पैशातून मिरवण्याची हौसही प्रशासनाने भागवून घेतली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मात्र याची पोलखोल झालीच. उडत्या चालीच्या गाण्यावर नृत्य सुरू असताना दोघांनी ‘पोसा रे पोसा, निवृत्त अधिकारी पोसा’, असे म्हणत ‘खाबुगिरी’ उघड केली. याची दखल घेतली तर प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे, असे कोण म्हणेल?

कोणता झेंडा घेऊ हाती ?

विधानसभा निवडणुकीत पक्षांतर किंवा बंडखोरी करून निवडणूक लढलेले पराभूत उमेदवार आता आपल्या जुन्या पक्षाशी व त्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेणारे पराभूत नेत्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडले. ‘कोणता झेंडा नेत्यांच्या हाती?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दौरे झाले. या नेत्यांच्या स्वागतासाठी काही पराभूत उमेदवारांनी लावलेल्या हजेरीवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघात शिवसेना लढली. बळीराम सिरस्कार यांना भाजपमधून आयात करीत उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला. पक्षाकडे उमेदवार नसताना शिवसेनेने बाळापूरसाठी आग्रह का धरला? उमेदवार भाजपकडून लादण्यात आला का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. या सर्व खेळीमागे नागपूर ‘कनेक्शन’ असल्याचे बोलले जाते.

विधानसभा लढली तरी सिरस्कार शिवसेनेत फारसे रमलेले दिसत नाही. भाजप नेत्यांशीच जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता भाजपमध्ये नसतानाही ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताला विमानतळावर गेले होते. दुसऱ्या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करून बाळापुरातून निवडणूक लढली. त्यांना ‘प्रहार’ पक्षाचा पाठिंबा होता. पक्षविरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाईदेखील केली, मात्र निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा अजित पवार व राष्ट्रवादीशी जवळीक सुरू केली. पवार अकोला दौऱ्यावर आले असताना कृष्णा अंधारेंनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यामुळे हे पराभूत उमेदवार नेमके कुठल्या पक्षात? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.

Story img Loader