सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० कोटी ५८ लाखाचे नुकसान केल्या प्रकरणी जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी बँकेच्या आजी, माजी संचालकासह ४१ जणांना चौकशी अधिकारी डॉ. प्रिया दळणर यांनी नोटीसा बजावल्या आहेत. या सर्वांना दि.२७ जून रोजी आपले म्हणणे मांडण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कारकिर्दीबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची महाराष्ट्र नागरी सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ८३ अंतर्गत चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये तक्रारीत तथ्य आढळून आले. तत्कालीन संचालक व अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बँकेचे ५० कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. यानंतर आता या नुकसानीची जबाबदारी निश्‍चितीची प्रक्रिया डॉ. प्रिया दळणर यांच्या समितीमार्फत सुरू झाली असून त्यांनी संबंधित आजी, माजी संचालक, अधिकारी अशा ४१ जणांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.

हेही वाचा – सातारा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद बाजारात बोकड व बकरीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री, कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल

हेही वाचा – सोलापूर : सव्वादोन किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा; सोनारासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महांकाली, माणगंगा सहकारी साखर कारखाना खरेदी, जिल्ह्यातील ७६३ विकास सोसायट्याचे संगणकीकरणावर अनावश्यक खर्च, महांकाली कारखान्याची शिल्लक व खराब साखर विक्री यामध्ये नुकसान झाल्याचा ठपका असून या सर्व बाबीमध्ये बँकेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.