सांगली : महापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित भागात शनिवारी महापालिकेच्यावतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सुमारे साडेचार टन कचरा संकलित केला.महापालिका क्षेत्रातील भाजी मंडई, घाट परिसर, सार्वजनिक वर्दळीची ठिकाणे, स्मशानभूमी आदी ११ ठिकाणे स्वच्छतेसाठी आज निवडण्यात आली होती. या उपक्रमात महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सकाळी सात ते १० या चार तासांच्या अवधीत सुमारे १२०० कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली. सांगली सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, विष्णू घाट, भाजी मंडई, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, कुपवाड येथील स्वामी मळा स्मशानभूमी, मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह, गाढवे चौक परिसर, लक्ष्मी मार्केट इत्यादी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या ठिकाणाहून सुमारे साडेचार टन कचरा संकलित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, निरीक्षक अनिल पाटील, याकूब मद्रासी यांनी दिली. आजच्या महास्वच्छता मोहिमेत उपआयुक्त विजया यादव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, सहायक आयुक्त सहदेव कावडे आदी अधिकारीही सहभागी झाले होते.