सांगली : मुंबईतील रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून मरणासन्न असलेल्या रूग्णाच्या शरीरात सांगलीतील रूग्णाच्या हृदयाची धडधड अवघ्या तीन तासांत सुरू करणे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या किमयेने शक्य झाले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा सांगलीतील उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तज्ज्ञांनी सोमवारी केला. सांगलीतील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी यांचा मेंदूमृत झाल्याचे निदान उष:काल अभिनव रूग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. या रूग्णांचे अवयवदान केल्यास काही रूग्णांना पुन्हा आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगत रूग्णालय प्रशासनाने कुटुंबियांना राजी केले.
या दरम्यान, मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेल्या रूग्णाला हृदयाची गरज असल्याची माहिती मिळाली, यानुसार हृदय मुंबईला धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सांगलीहून खास रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला ३८ मिनीटांत हे हृदय पाठविण्यात आले. यासाठी पोलीस यंत्रणेची मोठी मदत झाली. कोल्हापुरातून खास विमानाने अवघ्या दोन तासांत हे मृतावस्थेतील रूग्णाचे जिवंत हृदय रूग्णालयांत पोहचवण्यात आले. तात्काळ त्याचे रूग्णावर प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रियाही हाती घेण्यात आली. रविवारी रात्रीच ही शस्त्रक्रिया यशस्वीही झाली असल्याचे आज सांगण्यात आले.
हेही वाचा : “नेत्यांची घरं जाळायला येणाऱ्यांचे हात कलम करू”, शेंडगेंच्या विधानावर आव्हान देत जरांगे-पाटील म्हणाले…
या रूग्णाचे मूत्रपिंड एका खास वाहनाने पुण्याला पाठविण्यात आले. तर दोन नेत्र सांगलीतील रूग्णासाठी ठेवण्यात आले. अशा पध्दतीने मेंदूमृत झालेल्या रूग्णाने सहा जणांना जीवदान दिले. यासाठी सांगलीचे पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी कोल्हापूर मार्गावर आणि मिरज वाहतूक शाखेचे भगवान पालवे यांनी पुणे मार्गावर मानवी अवयवाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी प्रयत्न केले.