सांगली : जिल्ह्यात विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेला ८४ लाखांचा ८१३ किलो अमली पदार्थांचा साठा रविवारी पोलीस बंदोबस्तात जाळून भस्म करण्यात आला. शासनाच्या कृती आराखड्यानुसार पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मुद्देमाल १०० दिवसांत नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या ९ पोलीस ठाण्यांकडील अमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील गेल्या ३९ वर्षांतील जप्त अमली पदार्थांचा साठा पोलीस विभागाकडील गोदामात होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयात पाठपुरावा करून मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले.

जिल्ह्यातील ९ पोलीस ठाण्यांत दाखल १७ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला, पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन या अमली पदार्थांचा मुद्देमाल मिरज औद्योगिक वसाहतीतील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी येथे रविवारी बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला. ८१३ किलो २३२ ग्रॅम वजनाचे ८४ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ भस्म करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.