सांगली : सांगली पोलीस दलातील ४० जागांसाठी १९ ते २१ जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि गुणवत्तेवर आधारित असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली कुशलता स्पर्धेत सिध्द करावी असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.
सांगली पोलीस दलात ४० कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा पोलीस मैदानावर होणार आहे. यासाठीची प्रक्रिया ही नियमानुसार आणि पारदर्शी पध्दतीने होणार असल्याने कोणत्याही युवकांने भरतीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन श्री. घुगे यांनी केले.
हेही वाचा : “देशात जाती जनगणना करण्यात यावी”, छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले, “ही जनगणना झाली तर ओबीसींना…”
दरम्यान, पोलीस भरती ऐन पावसाळी हंगामात करणे उमेदवारांच्या क्षमतेबाबत आव्हानात्मक ठरणार असून जर स्पर्धेवेळी पाउस पडला तर उमेदवाराच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचा हंगाम संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी काही क्रीडा मंडळांनी एका निवेदनाद्वारे केली. या मागणीचे निवेदन जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने हीच वेळ योग्य असून उमेदवारापुढे असलेल्या अडचणीबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन श्री. कदम यांनी क्रीडा मंडळासह तरूणांना दिले.