सांगली : जत तालुक्यात एका आश्रमशाळेतील अल्पवयीन पाच मुलींवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पालकांकडून तक्रार दाखल झालेली नसली, तरी पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना आ. गोपीचंद पडळकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आल्याचे संस्थेच्या सचिवांनी जाहीर केले आहे.

जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही आश्रमशाळा असून, या शाळेत जतसह सांगोला तालुक्यातील विद्यार्थिनी शिक्षणासाठी दाखल होतात. यातील आठवी व नववीच्या पाच मुलींवर संशयिताने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार उन्हाळी सुटीला गावी गेल्यानंतर पालकांकडे केली. यानंतर अत्याचारित मुलींच्या पालकांनी संशयिताला चोपही दिला. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास ते पुढे आले नाहीत. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू होताच आणि याबाबतचे संदेश समाजमाध्यमातून प्रसारित होताच शुक्रवारी आ. पडळकर यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. पालक तक्रार दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना सुमोटो तक्रार दाखल करून संशयितावर कठोर कारवाईची सूचना केली.

दरम्यान, संस्थेचे सचिव कैलास सनमडीकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पुढील चौकशीस संस्थेचे संपूर्ण सहकार्य राहील, असेही सांगितले. हा प्रकार समोर येताच शुक्रवारी पोलिसासह समाजकल्याण आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेस भेट देऊन चौकशी केली. शाळेतील शिक्षकांचे व पीडितांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. मात्र, अद्याप याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.