सांगली : वयाची ९४ वर्षे गाठलेले आबा मोरे पाटील, धुणीभांडी करणारी लक्ष्मीबाई कांबळे ते आधुनिक वाल्मिकी अशी मराठी जगतात ओळख असलेल्या गदिमांचे साडेतीन वर्षांचे वारसदार युवान माडगूळकर आदी १९३ अबालवृद्धांनी २४ तास वाचन यज्ञात सहभाग घेऊन वाचनाचे महत्त्व आजच्या पिढीपुढे ठेवले.

आटपाडीत बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अखंड चोवीस तास वाचन यज्ञ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मराठी साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी वाचन चळवळ वादविण्यासाठी जोमाने कार्य करत आहे. एक लाख पुस्तके वाचन व आकलन उपक्रम, पुस्तक वार शनिवार, लेखक आपल्या भेटीला, वाचन सप्ताह हे उपक्रम यशस्वी झाले आहेत.
यंदा आटपाडी येथे स्व. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अखंड चोवीस तास वाचन यज्ञ हा उपक्रम रविवार दि. ९ रोजी सकाळी दहा ते १० मार्च रोजी सकाळी दहापर्यंत आयोजित केला होता. या उपक्रमात प्रत्येक वाचकाने आपल्या आवडीच्या पुस्तकाचे साखळी पद्धतीने प्रकट वाचन करायचे होते. मराठी साहित्य परिषद आटपाडी शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रेरणेने या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभला.

या उपक्रमात विविध प्रकारच्या दीडशेहून अधिक पुस्तकातील वाचन झाले. दिवसभर आणि रात्रभर वाचकांची रांग लागली होती. आबा मोरे पाटील (रा. यल्लापा पाटलाची वाडी) या ९४ वर्षांच्या वृद्धासह, मैनाताई गायकवाड (वय ८५) धुणीभांडी करणाऱ्या उच्चशिक्षित लक्ष्मीबाई मायाप्पा कांबळे यांच्यासह १९३ जणांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. उपक्रमाचा प्रारंभ मराठी साहित्यातील शब्दप्रभू म्हणून ओळख असलेल्या गदिमांचे वारसदार युवान तन्मय माडगूळकर या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या वाचनाने करण्यात आला. विविध वयोगटांतील विशेषत: तरुण वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती विद्याताई देशपांडे, माजी उपसभापती साहेबराव चवरे, एच.यू.पवार, ए.के. गायकवाड, प्रकाश नामदास, शरद चव्हाण पाटील, सावता पुसावळे, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.