सांगली : वाळव्यात अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. या मुलाने वर्गात शिक्षकाने अवमान केल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याच्या समजातून मुलाच्या नातेवाइकांनी संबंधित शिक्षकाच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रकार रात्री घडला.

विराज शिवाजी डकरे (वय १७) या मुलाने शुक्रवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयाच्या नजरेस आल्यानंतर त्याला तत्काळ इस्लामपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समजताच त्याच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांना धक्का बसला. वर्गात एका शिक्षकाने त्याला अवमानकारक वागणूक दिली. या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असे त्याच्या मित्रांचा समज झाला. ही माहिती कुटुंबातील लोकांना समजताच वाळवा-इस्लामपूर रस्त्यावर असलेल्या संबंधित शिक्षकाच्या घरावर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. यामध्ये खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर दारासमोर लावण्यात आलेल्या शिक्षकाच्या दुचाकीची दगडाने तोडफोड करण्यात आली. शिक्षकाच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच संबंधित शिक्षकाच्या घराजवळ पोलीस बंदेाबस्त तैनात करण्यात आला होता.

याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली असून, मुलाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरावर दगडफेक झाल्याप्रकरणीही कोणतीही तक्रार दाखल नसल्याचेही पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.