सांगली : उसतोडीसाठी बीड जिल्ह्यातून कडेगाव तालुक्यात आलेल्या एका महिलेवर मंगळवारी पहाटे तरसाने हल्ला केला. यामध्ये महिला जखमी झाली असून तिच्या डोक्याला इजा झाली आहे. तिच्यावर सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कडेगाव तालुक्यातील नेवरी ते हिंंगणगादे रस्त्यावर नेवरी गावच्या शिवारात उसतोड मजूरांची हंगामी वस्ती (पाले) असून या ठिकाणी राहण्यास असलेल्या निंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५ रा. बिबी, ता. लोणार जि. बुलढाणा) हिच्यावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. ही महिला अंगावर गोधडी पांघरूण व डोक्याखाली उशी घेऊन झोपली असताना प्राण्याने हल्ला केला. यामध्ये महिलेच्या डोक्याला मोठी जखम झाली असून हल्ला होताच महिलेने अचानक आक्रोश केला. यामुळे पालात असलेला तिचा पती झोपेतून उठला. त्याने लाथ घातल्यानंतर प्राण्याने धूम ठोकली. जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल संतोष शिरसेटवार, मानद वनजीव संरक्षक अजित पाटील आदींसह वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हल्ला करणार्या प्राण्याला अंधार असल्याने कोणी प्रत्यक्ष पाहिले नसले तरी या पालाभोवती पाहणी केली असता प्राण्याच्या पावलाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे हा हल्ला तरसाने केला असल्याचे वन विभागाच्या अधिकार्याकडून सांगण्यात आले.