सांगली : ज्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली म्हणून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असतानाही अशांना पुन्हा पायघड्या कशासाठी, असा सवाल करत निलंबनाची कारवाई झालेल्यांना पुन्हा पक्षात थारा देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मांडली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत बोलावली होती, या वेळी पाटील बोलत होते.
सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती आणि ती मुद्दाम भाजपच्या फायद्यासाठी केली होती, त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, अशी आग्रही मागणी त्यांनी बैठकीत मांडली. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तावाबाबत माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही, याबद्दल खेद व्यक्त केला. पक्ष हितासाठी या बंडखोर समर्थकांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली.
ज्यांनी काँग्रेसच्या विचाराशी आणि काँग्रेसचे उमेदवाराशी, काँग्रेसच्या भूमिकेशी प्रतारणा केली त्यांचा पुन्हा सन्मान केला तर काँग्रेस कशी वाढणार, असा सवाल देखील त्यांनी केला.
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, त्यांना समर्थन देणारे माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. ती कारवाई का झाली नाही, असा सवाल देखील पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला. त्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच खुलासा करू शकतील, अशी भूमिका घेत श्री सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांशी बांधिल राहून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. पक्षवाढ महत्त्वाचे आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे कुणाचीही गय करण्याची भूमिका घेतली जाणार नाही आणि भविष्यात अशा विचारांना थारा देण्याची काँग्रेसची भूमिका नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.