सांगली : दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासा गेलेले तिघेजण कृष्णा नदीत बुडाले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकजण बेपत्ता आहे. रात्री अंधारामुळे थांबवण्यात आलेली शोध मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
मिरज अर्जुनवाड घाट येथे दुर्गा माता देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण नदी पात्रात उतरले होते. यावेळी तीन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडत असताना आयुष हेल्पलाईन आपत्कालीन पथकाचे सदस्य योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उतरुन लक्ष्मण मोरे (वय ४५) अमोल गायकवाड (वय १७ रा. सुभाष नगर) या दोघा तरुणांना वाचवले. परंतु तिसरा तरुण अमित गायकवाड (वय १८ रा. सुभाष नगर) बुडत असल्याचे लवकर लक्षात आले नाही. त्यामुळे सदर तरुण बुडाल्याची माहिती आनंदे यांनी आयुष हेल्पलाइन पथकाला दिली असता तात्काळ आयुष हेल्पलाइन पथक घटनास्थळी दाखल होऊन सदर नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू केली. मात्र, बराच वेळ शोध मोहीम राबवण्यात आली, रात्री खूप अंधार असल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.
आज सकाळी परत शोध मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी यामध्ये आयुष हेल्पलाइन पथकाचे प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, चिंतामणी पवार, सुरज शेख, साहिल जमादार, प्रमोद जाधव, सिद्धार्थ रण खंबे, अग्निशामक दल सहभागी आहेत.